पुणे – दिल्लीत सहायक आयुक्त असल्याचे सांगत दारु विक्री परवान्याच्या नावाखाली 40 लाख 43 हजाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम गौर व रूजना गौर अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी परमेश्वर कुचेकर (33,रा.कोथरुड) यांना आरोपी शुभम गौर याने एस.सी.टी.दिल्ली येथे सहायक आयुक्त पदावर काम करत असल्याचे सांगितले. तसेच बनावट ओळखपत्र दाखवून विश्वास संपादन केला. यानंतर हडपसर येथे सदनिका घेण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
फिर्यादीसोबत शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात समजुतीचा करारनामा करुन फिर्यादी व त्याच्या मित्रांकडून वेळोवेळी 40 लाख 43 हजार रुपये घेतले. यानंतर फिर्यादीला बनावट दारु विक्री परवाना व वाईन बार परवाना दिला.
परवाना बनावट असल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पैशाची मागणी केली. मात्र त्याला पैसे परत न देता फसवणूक करण्यात आली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंढे करत आहेत.