पुणे – ट्रेडींग अॅपच्या माध्यमातून नफा मिळवून देण्याच्या अमिषाने एकाला 7 लाख 32 हजाराला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. ऑनलाईन पद्धतीने ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आयटी अॅक्ट कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत २९ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानूसार मोबाईलधारक व बँकेचा खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै ते ऑगस्ट 2021 दरम्यान घडला. मोबाईलधारकाने जुलै महिन्यात तक्रारदाराला फोन करून मी तुन्हाला ट्रेडींग अॅपच्या माध्यमातून नफा मिळवून देतो, असे अमिष दाखविले. तसेच, या अॅपवरून ट्रेडींगच्या माध्यमातून नफा झाल्याचे भासविले.
तक्रारदाराने यावर विश्वास ठेवला. त्यानंतर वेगवेगळ्या व्हिआयपी मेंबरशीप खरेदी करण्याच्या नावाखाली तक्रारदाराला बँकेच्या खात्यावर ऑनलाईन पैसे भरणे भाग पाडले. यानूसार तक्रारदाराने वेळोवेळी 7 लाख 32 हजार रुपये भरले. मात्र, त्यांना कुठलाही नफा न देता गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत देण्यात आली नाही. यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजु अडागळे करीत आहेत.