पुणे – लोणावळ्यातील प्रसिद्ध डॉक्टर खंडेलवाल व त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून घरावर दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये 66 लाख रुपयांचा ऐवज लुटला होता. यातील मुख्य आरोपीला पकडल्यावर हा दरोडा फिल्म सिटीत काम करणाऱ्या कामगारांनी टाकल्याचे निष्पन्न झाले. तेही डॉ. खंडेलवाल यांच्या घरात 600 कोटींची रोकड असल्याची माहिती मिळाल्याने कट रचण्यात आला होता. यासाठी मध्य प्रदेशातून सात जणांना बोलावण्यात आले होते. एकूण पंधरा जणांनी मिळून हा दरोडा टाकला होता.
लोणावळ्यामध्ये डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल (73) हे मागील 40 वर्षांपासून वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहेत. मध्यंतरी त्यांच्याघरात 600 कोटी रुपयांची रोकड असल्याची अफवा व्हॉट्सऍपवर पसरली होती. याची माहिती पोलीस आणि आयकर विभागालाही देण्यात आली होती. पोलिसांनी घरावर छापा टाकून आणि आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली. त्यांना तेथे काहीही आढळून आले नाही. मात्र, फिल्म सिटीतील दोन ते तीन कामगारांनी इतर साथिदारांसह उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार हेमंत कुसवाह याला सोबत घेत गोरेगाव येथे कटाची आणखी केली. लोणावळ्यात राहणाऱ्या कामगारांनी घराची रेकी केली.
मुसळधार पावसाची दरोड्यास साथ-
दरोडा टाकण्यासाठी कुसवाह साथीदारांसह लोणावळ्यात 17 जूनला दाखल झाला. डॉ. खंडेलवाल यांचे पहिल्या मजल्यावर हॉस्पिटल आणि दुसऱ्या मजल्यावर घर आहे. टीप देणाऱ्या स्थानिक व गोरेगावात राहणाऱ्या कामगारांनी घराच्या खाली पहारा दिला. तर, मध्य प्रदेशातून आलेल्या सात जणांनी पाईपवरून दुसऱ्यामजल्यावरील खिडकीतून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांना धमकावून हात-पाय बांधून ठेवले. यानंतर घरातील 50 लाखांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा 66 लाख 77 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दरोडा टाकायच्या वेळेस मुसळधार पाऊस होता. यामुळे हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना घटनेची काहीच खबर लागली नाही.
मंदिराला दान, गाडी, डिजे आणि मोबाइल-
आरोपींनी दरोड्यातील वाटणी झालेल्या पैशांतून त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू घेतल्या. यातील मुख्य आरोपी कुसवाह याने गावातील मंदिराला दीड लाखाचे दान दिले. तर, एकाने पैशातून बहिणीचे लग्न केले. काहींनी गाड्या घेतल्या. घरात डीजे घेतला तर, काहींनी तब्बल महागडे मोबाइल घेतले.
डॉक्टरांच्या घरातील 600 कोटींचे गुढ कायम-
डॉक्टरांच्या घरात 600 कोटींची रोकड असल्याची अफवा अद्यापही लोणावळा परिसरात आहे. डॉक्टरांच्या घरावर पोलीस, आयकर विभागाचे छापे टाकल्यानंतर तसेच हा दरोडा पडल्यानंतरही ही अफवा कायम आहे. आरोपींना पोलिसांनी पकडल्यानंतरही एका व्यक्तीने पोलिसांना घेऊन डॉक्टरांच्या घरात 600 कोटींची रोकड असल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याला वस्तुस्थिती सांगितली मात्र त्यानेच पोलिसांना तुम्ही निट तपासणी केली नसल्याने रोकड सापडली नसल्याचे सांगितले. यावर पोलिसांना अफवेचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे.