पुणे – शहरात नामांकित कंपनीच्या लोगोचा वापर करून बनावट वस्तूंची विक्री केली जात असल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत असून गुन्हे शाखेने कात्रज भागात केलेल्या कारवाईत तब्बल ८ लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ‘प्यूमा’ कंपनीचा लोगो वापरून विकल्या जाणार्या बॅगा, शूज आणि कपड्यांचा यामध्ये समावेश आहे. याप्रकरणी विक्रेत्यावर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवम बाबूलाल गुप्ता ( २४, रा. निपानी वस्ती, आंबेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शहरात प्यूमा या नामांकित कंपनीच्या लोगोचा वापर करून बनावट बॅगा, टि शर्ट, स्पोर्टस शूज, जॅकेट, कपड्यांची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानूसार युनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यासह पथकाने कात्रज भागातील स्टायलॉक्स फॅशन हब या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी दुकानात पॅन्ट, शर्टसह इतर वस्तूंवर प्यूमा या कंपनीचे बनावट टॅग लावून विक्री होत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने येथून ८ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीने हा माल कोठून आणला, याबाबत तपास करण्यात येत आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे, विनोद चव्हाण, पुष्पेंद्र चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखील जाधव, गणेश थोरात आणि नागनाथ राख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, प्युमा कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधी मार्फत पुणे शहरात बनावट माल विक्रीची शोध मोहिम चालू आहे. शहरातील उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या बनावट मालांची विक्री होत आहे. याची जाहिरात सोशल मिडियावर जोरदार सुरु आहे. ब्रँडेड कंपन्यांचे दहा हजारांचे शूजची बनावट कॉपी अवघ्या हजार रुपयांत विकली जात आहेत.