पुणे – सहकारी संस्था निबंधक कार्यालयात प्रतिज्ञापत्राद्वारे चुकीची माहिती सादर करून तसेच गृहरचना संस्थेची नोंदणी केल्याप्रकरणी सोळा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत गणेश जोगी शेट्टी (वय ६५, रा. निलांबरी बिल्डिंग, एरंडवणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोसायटीतील सोळा सदनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेट्टी हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांचे एरंडवणे भागात हॉटेल आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या आरोपींनी शिवाजीनगर येथील सहकारी संस्था निबंधक कार्यालयात एरंडवणे येथील मिळकतीस मिळालेला महापालिकेचा १९९९ मधील मंजूर नकाशा सादर केला होता. आरोपींनी सद्या:स्थितीत तेथे झालेल्या बांधकामाची माहिती न देता चुकीच्या माहितीच्या आधारे निलांबरी गृहरचना संस्था स्थापन करण्यासाठी मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र सादर केले. मूळ कागदपत्रे लपवून ठेवली, असे शेट्टी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
शेट्टी यांचे याच भूखंडावर हॉटेल आहे. त्यांची मालकी असलेला भूखंड आरोपींनी निलांबरी सोसायटीत समाविष्ट करून घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केली,.शेट्टी यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची शहानिशा तसेच कागदपत्रांची पडताळणी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड तपास करत आहेत.