पुणे – इमारतीच्या पार्किंगमध्ये झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावरून मोटार चालवून कणा मोडल्याप्रकरणी तरूणाविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 सप्टेंबरला रात्री पावणेनउच्या सुमारास येवलेवाडीतील थ्री ज्वेल्स सोसायटीत घडली. विपुल मिरचंदानी (35 ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पद्ममीनी पीटर स्टम्प (63 , रा. शंकरशेठ रस्ता) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडीत थ्री ज्वेल्स सोसायटी असून विपूल मिरचंदानी तेथे कुटूंबियासह राहायला आहेत. 3 सप्टेंबरला रात्री पावणेनउच्या सुमारास ते भरधाव वेगात मोटार चालवित इमारतीच्या पार्किंगमध्ये आले. त्यावेळी पार्किंगमध्ये झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावरून त्यांची मोटार गेल्यामुळे ते जखमी झाले.
उपचारादरम्यान कुत्र्याचा कणा मोडल्याचे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी निदान केले. याप्रकरणी पाळीव प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कलमानुसार विपुल यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.