पुणे – व्याभिचारी आणि क्रुरतेची वागणूक देणाऱ्या पतीपासून पत्नीला न्यायालयाने घटस्फोट मंजुर केला आहे. नुकसान भरपाई म्हणून 2 लाख रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 5 हजार रुपये पत्नीला देण्यात यावेत, असे आदेश कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी पतीला दिले आहेत.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. माधवीने ऍड. के.टी. आरू आणि ऍड. मनिषा शेट्टी यांच्यामार्फत जुलै 2016 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. माधव आणि माधवीचा प्रेमविवाह मे 2009 मध्ये झाला आहे. दोघांना सात वर्षाचे एक आपत्य आहे.
सुरूवातील माधवीचे आई-वडिल लग्नास परवानगी देण्यास तयार नव्हते. मात्र, काही कालवधीनंतर त्यांनी परवानगी दिली. माधव एका खासगी कंपनीत कामाला होता. त्यानंतर त्याने नोकरी सोडली. कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी तो घेत नव्हता.
किरकोळ कारणावरून तिला भांडण होत असत. त्यावरून तो तिला मारत असत. तिच्या एटीएममधून पैसे काढून घेत असत. त्याला दारूचे व्यसन होते. एकेदिवशी दारू पिऊन घराबाहेर काढले. त्यावेळी पत्नी एक महिना माहेरी होती. त्यानंतर तिची आणि आई-वडिलांची समजूत काढून तो तिला घेऊन आला. त्यानंतरही तो तिला त्रास देतच होता.
तिचे मंगळसूत्र घेऊन गहाण ठेवले होते. तर नेकलेस विकले होते. त्याने टी.व्ही. खरेदी केली. त्याचे हप्तेही तिला भरावे लागले. दोघे भाड्याच्या खोलीत राहु लागले. त्यानंअर पुन्हा भांडण झाल्यानंतर फेब्रुवारी 2016 मध्ये त्याने तिला घराबाहेर काढले.
दरम्यान पतीचे बाहेर विवाहित स्त्रीशी संबंध असल्याचे तिला समजले. तिने पती, त्या विवाहित स्त्रीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला. त्याला दारूचे व्यसन असल्याचे आणि त्याचे परस्त्रीशी संबंध असल्याचे सिध्द झाल्याने घटस्फोट मंजुर झाल्याचे ऍड. के.टी. आरू यांनी सांगितले.