पुणे – बारमध्ये बील देण्याच्या वादातून तीन ग्राहकांना बारच्या १० ते १५ कर्मचाऱ्यांनी मिळून बेदम मारहाण केली. त्यांना अर्धा तास बारमध्ये कोंडून मारहाण केल्यानंतर पुन्हा रस्त्यावर आणून लाथाबुक्क्यांनी आणि बांबुने मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांमधील नऊ कर्मचारी मुळचे पश्चिम बंगालचे आहेत.
याप्रकरणी सेल्समन असलेल्या एका तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन बिबवेवाडी पोलीस ठाण्यात बारमधील १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना स्वामी विवेकानंद रस्त्यावरील एस.के. बारमध्ये मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी ओमकार रविंद्र आंधळकर (२६, रा.बिबवेवाडी) हा त्याचे मित्र गजानन खुडे आणि अजय नाईक यांच्यासमवेत बारमध्ये मद्यपान करण्यात गेला होता. मद्यपान झाल्यावर त्यांचे तेथील कर्मचाऱ्यांशी बिलावरुन वाद झाले. यानंतर बारचा कॅप्टन प्रदीप ठोंकरे याने कर्मचाऱ्यांच्या मदतीने तीघांनाही बारमध्ये कोंडून जबर मारहाण केली.
यानंतर पुन्हा बारच्या बाहेर काढून रस्त्यावर बेदम मारहाण केली. येथे बांबूने कपाळावर, पोटात आणि डोक्यात मारहाण करण्यात आली. यातील नऊ कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली असून ते मुळचे पश्चिम बंगालचे आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शशीकांत शिंदे करत आहेत.