पुणे – मोक्काच्या गुन्हयातील फरार आरोपी शुभम कामठे याला लोणीकाळभोर पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली. त्याच्याकडे पिस्तूल व काडतूसे सापडली. तो एका खूनाच्या गुन्हयातही वॉण्टेड होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दिनांक 17 मे रोजी रोहन इंगळे याच्यावर टोळी प्रमुख शुभम कैलास कामठे (26 रा.मराठी शाळेचे मागे कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर) व त्याचे साथीदार यांनी धारदार कोयत्याने जिवघेणा हल्ला करून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला.
यानंतर शस्त्र हवेत फिरवत दहशत निर्माण केली. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये खूनाचा प्रयत्न व आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील टोळीप्रमुख शुभम कैलास कामठे हा गेले 3 महीन्यापासुन फरार होता. तो सातत्याने पोलीसांना गुंगारा देत होता. तो रविवारी पहाटे सोरतापवाडी गावचे हददीत येणार असल्याची माहीती लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अमित साळुखे निखील पवार यांना मिळाली.
त्यावरून वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांसह सोरतापवाडी येथे सापळा रचण्यात आला. कामठे हा सोरतापवाडी येथील गोल्डन ड्रिम्स लॉजचे समोर आला. परंतु त्याला तेथे पोलीसांची चाहुल लागताच तो पोलीसांना चकवा देवुन तेथुन पळुन जावु लागला.
पोलीसांनी त्याचा मोठया शिताफीने पाठलाग करून त्यास काही अंतरावर पकडुन ताब्यात घेतले. त्याचेकडुन एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन काडतुस जप्त करण्यात आलेले आहे. त्याबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आलेली आहे. आरोपी शुभम कैलास कामठे याचेवर लोणीकाळभोर व हडपसर पोलीस स्टेशन येथे खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे , सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर दादाराजे पवार, पोलीस शिपार्स अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, पोलीस अंमलदार अमित साळुके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, राजेश दराडे,दिगंबर साळुके, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, रोहीदास पारखे यांचे पथकाने केली आहे.