Pune Crime : पत्नीस भेटायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला

धुमाकूळ घालणाऱ्या सोनसाखळी चोराकडून 7 लाखाचा ऐवज हस्तगत

पुणे – सोनसाखळी चोरी केल्यानंतर फरार होउन पत्नीला कोंढव्यात भेटायला आलेल्या सराईताच्या गुन्हे शाखेने मुस्क्‍या आवळल्या आहेत. त्याच्याकडून 10 गुन्हे उघडकीस आणून 7 लाख 6 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफालाही अटक करण्यात आली आहे. असद उर्फ असदुल्ला माशाअल्ला जाफरी उर्फ इराणी (47 , रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर ) असे अटक केलेल्या सोनसाखळी चोराचे नाव आहे.

सोनसाखळी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हे शाखेकडून हद्दीत पेट्रोलिंग केले जात होते. त्यावेळी वटपौणिमेला महिलेची सोनसाखळी हिसकावून फरार झालेला सराईत चोरटा पत्नीला भेटण्यासाठी कोंढव्यातील जे के पार्क मध्ये येणार असल्याची माहिती कानिफनाथ कारखेले आणि सचिन पवार यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या पथकाने सापळा रचून असदला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदाराच्या मदतीने महिलेची सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत असद आणि साथीदारांनी शहरातील विविध भागात 9 सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्याशिवाय दुचाकीचोरीचा गुन्हा असे मिळून 10 गुन्हे उघडकीस आले.

सोनसाखळी चोरी केल्यानंतर असद हा कोंढव्यातील सराफ विशाल सोनी याला विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हे शाखेने सराफ सोनी यालाही अटक केली आहे. त्याच्याकडून 14 तोळे सोने जप्त करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, एपीआय नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतीक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळकेर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.