पुणे – शिवाजीनगर पोलिसांनी ५१ घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास जेरबंद केले. त्याच्याकडून १७ लाख ७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. हा गुन्हेगार गुन्हा करताना आणि निघुन जाताना वेश बदलण्यास पटाईत होता. तसेच पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो मुद्दामहुन सीसीटीव्हीखाली बंद मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करायचा. हर्षद गुलाब पवार ( ३१, रा. गुलाबनगर, घोटावडे फाटा, मुळशी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी माहिती देताना पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल यांनी सांगितले की, पोलीस हवालदार सचिन जाधव यांना खबर मिळाली की, घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी म्हसोबा गेट बस स्थानकापाशी येणार आहे. त्यानूसार त्यास सापळा रचून पकडण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये तब्बल घरफोड्या केल्याची कबुली दिली. तो २०२३ मध्ये जामिनावर सुटला असून त्याच्यावर ५१ पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस सीसीटीव्ही तपासून आपला माग काढू नये म्हणून हर्षद घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास करायचा तसेच जातानाही ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास करायचा. अनेकदा तो स्वत:च्या घरी न जाता एखाद्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये झोपायचा. तो शनिवार आणि रविवारी मात्र घरफोडी करायचा नाही.
या दिवशी नोकरदार वर्ग घरी असल्याचे रिस्क नको म्हणून तो चोरी करणे टाळायचा. तेसच स्वत:ची ओळख लपविण्यासाठी वेगवेगळी जॅकेटस, टोपी परिधार करायचा.चुकून सीसीटीव्हीमध्ये छबी आलीच तर पोलिसांचा तांत्रीक तपास भरकटावा यासाठी मोबाईल कानाला लावून बोलण्याची ॲक्टींग करायचा. प्रत्यक्षात मात्र त्याचा मोबाईल बंद असायचा. यामुळे मोबाईलचा डंम्प डाटा काढल्यावर त्याचा नंबर शोधणे पोलिसांना मुश्किल असायचे. चोरलेले दागिने विकण्यासाठी त्याने निलकंठ राऊत या सहकाऱ्याची मदत घेतली होती.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त, साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे, राजकुमार केंद्रे , उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार रुपेश वाघमारे, भाऊ चव्हाण, प्रमोद मोहिते, राजकिरण पवार, महावीर वलटे, अंमलदार सचिन जाधव, प्रविण दडस, सुदाम तायडे, कृष्णा सांगवे, तेजस चोपडे, आदेश चलवादी यांच्या पथकाने केली.