पुणे – भाजपच्या माजी नगरसेवकाने त्याच्यावर झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी दोन सुपारी किलरला खुनाची सुपारी दिली होती. हे दोन्ही सुपारी किलर शस्त्रांसह पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन माजी नगरसेवकाच्या कृत्याचा पर्दाफाश झाला आहे. या माजी नगरसेवकावर सन 2016 मध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी गोळीवार करण्यात आला होता.
पुणे कॅन्टोन्मेंटचे तत्कालीन उपाध्यक्ष व भाजपचे माजी नगरसेवक विवेक महादेव यादव यांनी कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला आपला विरोधक बबलू गवळी याच्या खूनाची सुपारी दिली होती. गवळी हा येरवडा कारागृहात अंडरट्रायल असून, नुकताच कोविड रजेवर बाहेर आला आहे.
राजन जॉन राजमनी (वय 38, रा.भाग्योदय नगर, कोंढवा), इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख (वय 27, रा काळा खडक वाकड,पिंपरी-चिंचवड) या दोघा सुपारी किलरना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्यासंह नगरसेवक विवेक यादव तसेच मांडवली करून हत्यारे व रोकड पुरविणारा व्यक्ती अशा चौघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे गस्तीवर असताना पोलीस कर्मचारी सुशील धिवार यांना कारागृहातून कोविड रजेवर आलेला गुन्हेगार व त्याच्या मित्राने कोणाच्या तरी खूनाची सुपारी घेतली आहे. या सुपारीला अंतिम स्वरुप देण्यासाठी ते दोघे कोंढवा परिसरात येणार असल्याची खबर मिळाली. त्यानूसारी सापळा रचून राजन व इब्राहिम या दोघांना अटक करण्यात आली. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे तीन पिस्तूले, तीन काडतूसे व रोख 1 लाख 20 हजार रुपये मिळाले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी विवेक यादव यांनी सुपारी दिल्याची कबुली दिली.
दरम्यान अंगझडतीत त्यांच्याकडे मिळून आलेल्या मोबाईलची पाहणी केली. त्यामध्ये राजन याने व्हिके व व्हिके न्यू या नावाने सेव्ह असलेल्या दोन मोबाईल क्रमांकावर संशयास्पद संभाषण केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बर सय्यद व उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे करत आहेत.