पुणे – तीन वर्षापासून पोलीसांना गुंगारा देणाऱ्या खूनाच्या प्रयत्नातील आरोपीस समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाने जेरबंद केले. मेहमुद बाबू घोडके( मुळ रा. भवानी पेठ, रुपी बॅंक शेजारी, पुणे सध्या रा. न्यू म्हाडा बिल्डींग, वैदुवाडी- हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
गुन्हयांमध्ये पाहिजे आरोपींचा शोध घेणेकामी पट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार सुमित खुट्टे व निलेश साबळे यांना खबर मिळाली की, मागील तीन वर्षापासून खूनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी हा भवानी पेठ येथे आला असून तो रिक्षा मध्ये बसलेला आहे.
लागलीच खबर वरिष्ठांना कळवून तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे व पोलीस कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जावून बातमी प्रमाणे खात्री करून त्याचेकडे नमुद गुन्हयाबाबत चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याने केलेची कबुली दिली.
गुन्हा घडलेपासून आरोपी हा वारंवार पत्ता बदलून रहात असलेने मिळून येत नव्हता. सध्या आरोपी हा हडपसर येथे त्याचे कुटूंबासह रहात आहे. सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांचे मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार सुमित खुट्टे, निलेश साबळे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, सुभाष मोरे, श्याम सुर्यवंशी, हेमंत पेरणे, विठ्ठल चोरमले यांनी केली आहे.