पुणे – मनुष्यबळ व्यवस्थापकाने आपल्याच कंपनीतील नोकरदार मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. याशिवाय पाहिले लग्न होऊनही ही बाब पीडित मुलीपासून लपवून तिची फसवणूक केली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निलेश अरविंद मोरे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलगी कदमवाकवस्ती येथील एका खासगी कंपनीत नोकरीस लागली होती. तेथील मनुष्यबळ व्यवस्थापक निलेश मोरे याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहित असल्याचे त्याने पीडितेपासून लपवून ठेवले. तसेच लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी पीडितेबरोबर वेळोवेळी अनैतिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान आरोपी विवाहित असल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने आरोपीला जाब विचारला. मात्र त्याने तिला धमकावणे सुरू केले. तिचा मोबाईल हिसकावून घेतला. या त्रासाला कंटाळून पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबीयांनी धीर दिल्याने तिने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत.