पुणे – शस्त्रांची तस्करी करणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून तीन गावठी कट्टे व सहा जीवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली. तर त्याच्याकडून शस्त्र खरेदी करणाऱ्या तीघांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी एकूण 8 गावठी कट्टे व 15 जिवंत काडतूसे असा 4 लाख 30 हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. तो मध्य प्रदेशातून गावठी कट्टे आणून शहरातील गुन्हेगारांना विकत होता.
भूषण महेश मराठे(23,रा.चोपडा, जि.जळगाव), राहुल चंद्रकांत पवार(26,रा.नसरापूर, ता.भोर), तौफीक गुलाब शेख(25,रा.शिवाजीनगर) आणी राम गोरोबा जाधव(35,रा.दांडेकर पूल) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मुळचा जळगावच्या असलेला भूषण मराठे हा 2016 पासून शस्त्रांची तस्करी करत होता. त्याने पुण्यामध्ये प्रिटींगचा डिप्लोमा केला आहे. तसेच सध्या तो बीए करत आहे. पुणे शहरात त्याचे नातेवाईक आहेत. यामुळे त्याला शहराची पुर्ण माहिती होती. त्याचे गाव चोपडा पासून मध्य प्रदेशची बॉर्डर 40 किलो मीटर आहे. मध्य प्रदेशातील अनेक गावांमध्ये गावठी कट्टे आणी काडतूसांची निर्मीती केली जाते.
पुण्यात रहात असताना त्याला यासंदर्भात माहिती झाली होती. या तस्करीत पैसा मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने त्याने स्वत: मध्य प्रदेशातून गावठी कट्टे आणून शहरातील गुन्हेगार व इतरांना विकण्यास सुरवात केली. तो पुणे रेल्वे स्थानकावर जळगाव येथून शस्त्र विकण्यासाठी आला असल्याची खबर खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती.
त्यानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता तीन गावठी कट्टे आणी सहा काडतूसे मिळाली. त्याला पोलीशी खाक्या दाखवताच त्याने शस्त्रे विकणाऱ्यांची नावे सांगितली. त्यानूसार इतर तीघा आरोपींकडून उर्वरीत कट्टे आणी काडतूसे हस्तगत केली गेली. यातील राहूल पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अपहरण असे पाच गुन्हे दाखल आहेत. तर राम जाधववर राजगड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सह आयुक्त रविंद्र शिसवे, अपर आयुक्त(गुन्हे) अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, अंमलदार संपत अवचरे, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, विजय गुरव, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, प्रदिप गाडे, अमोल पिलाणे, भूषण शेलार, शैलेश सुर्वे, मोहन येलपल्ले , रुपणाली कर्णवार, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.