निमोणे (पुणे) – शिरुर तालुक्यातील करडे-रांजणगाव गणपती या अष्टविनायक महामार्गावर कारचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. बाभुळसर खुर्द गावातील पिरसाहेब मंदीरासमोर सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकडावर चार जण गप्पा मारत बसले होते. यावेळी करडे येथुन रांजणगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आय 20 कारने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत रामदास किसन शिंदे (वय 55) या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत. याबाबत महादु विठ्ठल वांझुळ (वय 48, रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून कार चालक आशिष योगेंद्र बांदल (रा. करडे ता. शिरूर जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि 29) सकाळी 8 वाजताच्या सुमारास रामदास किसन शिंदे, संतोष नंदु वाळके, अकबर अलीभाई शेख, महादु विठ्ठल वांझुळ हे सर्व (रा. बाभुळसर खुर्द ता. शिरुर, जि. पुणे) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बाकडावर बसून गप्पा मारत होते. यावेळी आशिष बांदल हा करडे येथुन रांजणगावच्या दिशेने त्याच्या कारने (एम. एच. 12 पी. सी. 5333) भरधाव वेगाने चालला असता त्याचे कारवरील नियंत्रण सुटून वरील चार जणांना कारची जोरदार धडक बसली.
या अपघातात फिर्यादी महादु वांझुळ यांचा पाय फॅक्चर झाला असून त्यांच्या डोक्यास व कमरेस मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच संतोष वाळके आणि अकबर शेख यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर रामदास शिंदे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान अपघात झाल्यानंतर कारचालक आशिष बांदल हा कार जागीच सोडून पळून पसार झाला आहे. रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष पवार या घटनेचा पुढील तपास करत आहेत.