पुणे – बांधकाम व्यवसायिक युवराज ढमाले यांना गाडीखाली चिरडून मारण्याची धमकी देण्यात आली असून 15 लाखांच्या खंडणीची मागणी देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवीलाल देवजीलाल प्रजापती (वय 40), जितू प्रजापती (रा. कोंढवा) आणि एका अज्ञात व्यक्तींविरुद्ध खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज सिताराम ढमाले (रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. ढमाले हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांची कोंढव्यातील गोकुळ हॉटेल समोर साईट सुरू आहे.
काम पुर्ण झालेल्या बांधकामाच्या साईटवरील बहुतांश फ्लॅटचा ताबा काही सदस्य वगळता इतर सर्वांना देण्यात आलेला आहे. त्यांनी फ्लॅट धारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था अंतर्गत सोसायटी स्थापन केली आहे. यातील रविलाल प्रजापती याने सोसायटीतील सदस्यांची बैठक बोलावली होती. त्याने ढमाले यांना कॉमन ऍमिनिटीजचा ताबा अजून आम्हाला दिला नाही.
सोसायटीतील सदस्यांना भडकावून तुमच्याविरुध्द गुन्हा दाखल करायला भाग पाडू, तुमची बदनामी करेन अशी धमकी दिली. यानंतर त्यांना 15 लाखाची खंडणी मागून गाडीखाली चिरडून मारायची धमकी दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गपाट करत आहेत.