पुणे – ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी वडिलांकडून 15 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत विवाहीतेचा छळ करून तिच्यावर घटस्फोटासाठी दबाव टाकल्याप्रकरणात पती, सासू, दोन नणंद आणि एक नणंदच्या पतीला प्रत्येकी 15 हजार रुपयांचा अंतरिम अटकपुर्व जामीन सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी मंजुर केला.
पती अतुल भुजबळ, सासू अलका भुजबळ, नणंद चैताली भुजबळ, नणंद दिपाली ताजणे, तिचे पती किरण ताजणे अशी अटकपुर्व मिळालेल्यांची नावे आहेत. सर्वांनी ऍड. पुष्कर पाटील, ऍड. रेश्मा सोनार आणि ऍड. शुभांगी जेटीथोर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्या विवाहितेचे दोन ठिकाणचे जन्म दाखले आहेत. तसेच, पासपोर्टही आहेत.
याबाबत पासपोर्ट ऍथॉरीटी, तहसील कार्यालय, जन्म-मृत्यु कार्यालयात अर्ज केला. त्यानंतर आपल्यावर कारवाई होईल का? या भीतीने तिने खोटी केस दाखल केली आहे. तसेच तक्रार देताना घटस्फोटाचा दावा कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित असल्याचे पोलिसांना सांगितले नाही. त्यामुळे तीने फक्त त्रास देण्याच्या हेतूने ही तक्रार दाखल केली आहे.
सासरे मयत असताना देखील त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील चुकीचे असल्याचा युक्तीवाद ऍड. पाटील यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने हा आदेश दिला. याप्रकरणी अतुलच्या पत्नीने पोलिसात फिर्याद दिली आहे.
अतुलचा विवाह 20 नोव्हेंबर 218 रोजी झाला. 15 तोळे सोने, संसारउपयोगी साहित्य,5 रोख लाख रुपये देऊन थाटामाटात लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर पतीबरोबर ऑस्ट्रेलिया येथे जाणार असे ठरले होते. मात्र, लग्नानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये अतुल हा ऑस्ट्रेलियाला निघून गेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी पैसे माहेरहून आणण्यास सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.