पुणे – गाडी पुसण्यासाठी कापड दिले नाही म्हणून तिघांनी एका तरुणाच्या गालावर चाकूने वार करत खूनाचा प्रयत्न केला. ही घटना झेड कॉर्नर मांजरी येथील रोडवर सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
याप्रकरणी एका 16 वर्षीय मुलाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोपेड दुचाकीवर आलेले संदीप भैय्या पानसरे व त्याचे इतर दोन अनोळखी मित्र अशा तिघांच्या विरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी अल्पवयीन मुलगा त्याचा मित्राला मांजरी भागात भेटण्यासाठी गेला होता. मित्राच्या वडिलांचे गॅरेज आहे. त्यावेळी तिघेजण गॅरेजमध्ये आले.
अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मित्र गॅरेजजवळ थांबले होते. तिघा आरोपींनी गाडी पुसायला त्यांच्याकडे कापड मागितले. अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्राने नकार दिल्यानंतर तिघांनी अल्पवयीन मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गाडेकर तपास करत आहेत.