पुणे: फोनवर बोलत दुचाकीवरून निघालेल्या व्यक्तीला हटकले म्हणून त्याने पोलिस हवालदाराच्या डोक्यात दगड घातला. राजेश गणपत नाईक (वय.47) असे पोलिस हवालदाराचे नाव आहे. त्यांच्या डोक्यात गंभीर जखम झाली आहे. दरम्यान, दगड मारणारा दुचाकीस्वार फरार झाला असून, फुरसूंगी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी, पोलिस हवालदार नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फुरसूंगी पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरूवारी (दि.6) सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास भेकराईनगर चौकात घडला आहे. तर मागील काही दिवसापुर्वी हडपसर वाहतूक विभागातील एका पोलिस कर्मचार्याच्या डोक्यात महिलेने चप्पल मारली होती. फुटपाथवर लावलेली गाडी काढण्यास सांगितले म्हणून तिने कर्मचार्याला मारहाण केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलिस हवालदार नाईक हे फुरसूंगी वाहतूक विभागात नेमणूकीस आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नाईक येथील भेकराईनगर चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यांना एक दुचाकीस्वार फोनवर बोलत गाडी चालवत असताना दिसून आला. नाईक यांनी त्याला थांबवून फोनवर बोलू नकोस, असे सांगितले. त्याचा त्याला राग आला आणि त्यातूनच त्याने नाईक यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून नाईक यांच्या डोक्यात घातला.