पुणे – शहरात झालेल्या जबरी चोरीच्या चार गुन्ह्यात आरोपी असलेल्या पाच जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजुर केला आहे. दीपक परशुराम माळी (वय 21, रा. हडपसर), मुकेश सुनील साळुंखे (वय 19, रा. मुंढवा), प्रमोद सुनील पाटील (वय 22, खरपुडेनगर), अनिस अब्दुल रशिद शेख (वय 40) आणि जमीर मलंग अत्तर (वय 20, दोघेही, रा. वडगावशेरी) अशी त्या आरोपींची नावे आहेत. सर्वांनी ऍड. रफिक शेख, ऍड. बी.आर. शेडगे, ऍड. एन.जी.गायकवाड आणि ऍड. योगेश पवार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
मागील काही दिवसात शहरात जबरी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याचा तपास करून पोलिसांनी कारवाई करत हे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
18 सप्टेंबर रोजी मुंढवा, केशवरनगर येथे 80 हजार रुपये किंमतीचे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविण्यात आले होते. याबाबत मुंढवा येथे, तर कोंढवा येथे 2 आणि कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्यात विविध अटींवर जामीन मंजुर करण्यात आला आहे. सोनार असलेल्या जमीर अत्तर याला खोट्या गुन्ह्यात गुंतविल्याचा युक्तीवाद ऍड. रफिक शेख यांनी केला.