– संजय कडू
पुणे – भारती विद्यापीठ परिसरात शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी कात्रज बोगद्यावरील डोंगर भागातील दरीमध्ये लपले होते. त्यांच्याकडून मागील चार दिवसांत केलेले तीन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत.
विशाल शिवाजी शेळके(20,रा.शनिनगर, आंबेगाव खुर्द) व रविंद्र शुभम हिरे(19) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 7 मार्च रोजी आरोपींनी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याला सच्चाईमाता डोंगर परिसरात नेले होते. तेथे त्याला बेदम मारहाण केली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यावर पोलीस आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान आरोपींनी दुसऱ्याच दिवशी एका तरुणाचा पाठलाग करत, त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना आंबेगाव येथील बेलदरे पेट्रोल पंपामध्ये घडली.
यावेळी पेट्रोल पंपावरील नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवत दहशत पसरवून एका रिक्षाची काच फोडण्यात आली. त्यानूसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी साहिल याच्या आईने पोलीस स्टेशनला यातील आरोपींविरुध्द एक तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार मागे घ्यावी म्हणून आरोपींनी तगादा लावला होता.
हा गुन्हा केल्यानंतर आरोपींनी सायंकाळी आंबेगा बुद्रुक परिसरातील भाजी विक्रेत्याला हत्याराचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. यानंतर त्याच्याकडील 16 हजार रुपये चोरुन नेले. आरोपींचा शोध घेत असताना आरोपी कात्रज येथील दरीत लपून बसले असल्याची खबर मिळाली. पोलिसांचे पथक तेथे जाताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पाठलाग करुन पकडण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रविंद्र भोसले, संतोष भापकर, शिवा गायकवाड, गणेश शेंडे, राहुल तांबे, संतोष अनुसे, विक्रम सावंत, सर्फराज देशमुख, अभिजित जाधव, निलेश खोमणे, हर्षल शिंदे, समिर बागसिराज, जगदीश खेडकर यांच्या पथकाने केली.