पुणे – धारधार हत्याराने वार करून तरुणीच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरिफ इसाक शेख (वय.27,रा. कोंढवा खुर्द) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरिफ याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरिफ आणि फिर्यादी तरुणी या दोघांचा विवाह ठरला आहे.
पैशाचा आर्थिक वाद व त्याच्याशी लग्न करू नये म्हणून त्याने तरुणीच्या खूनाचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना 16 ऑगस्ट या कालावधीत सासवड रोडच्या बाजूला असलेल्या एका बंद फार्महाऊसवर घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी आणि आरिफ यांच्यात प्रेमसंबंध आहेत. दोघांचा विवाह देखील ठरला आहे. काही दिवसांपुर्वी तरूणीने आरिफला उसने पैसे दिले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही तो पैसे परत करत नव्हाता. त्यामुळे तरूणीने आरिफकडे पैशांसाठी तगादा लावला होता.
दरम्यान, 16 ऑगस्टला रात्री नउच्या सुमारास आरिफने फिर्यादी तरुणीला जेवण करण्याच्या बहाण्याने सासवड रस्त्यावरील एका फार्महाउसमध्ये नेले. त्याठिकाणी त्यांच्यात पैशांमुळे वादावादी झाली. त्याचा राग आल्यामुळे आरिफने तरुणीवर चॉपरने वार करून गंभीररित्या जखमी केले. मात्र, त्यावेळी तरूणीने त्याची माफी मागून पुन्हा पैसे मागणार नसल्याची सांगितले. त्यानंतर आरिफने तिला रूग्णालयात दाखल केले.
त्यानंतर तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला असता, आरिफनेच तिच्यावर चॉपरने वार करून गंभीर जखमी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी दिली आहे.