पुणे – शहरातील वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी बँकांच्या एटीएम यंत्राची तोडफोड करून रोकड लांबविण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. कोंढव्यातील साईनगर परिसरात उन्नती हेरिटेज सोसायटीत तळमजल्यावर बँक ऑफ बडोदाचे एटीएम केंद्र आहे. चोरट्यांनी पहाटे तीनच्या सुमारास एटीएम केंद्रात प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली.
चोरट्यांनी एटीएम यंत्राची तोडफोड केली. एटीएम यंत्रातून रोकड काढण्याचा प्रयत्न केला. एटीएम केंद्रातील बॅटरीची वायर तोडण्यात आली. एटीएम यंत्रातून पैसे न काढता आल्याने चोरटे पसार झाले. एटीएम यंत्राची तोडफोड झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक राहुल नायर यांनी यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करत आहेत.
खडकी बाजार परिसरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम केंद्राची तोडफोड करून रोकड चोरीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एटीएम केंद्राची देखभाल करणारी कंपनीतील कर्मचारी उमेश लामखडे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर कदम तपास करत आहेत.