पुणे, दि. ११(प्रतिनिधी) – घरगुती वादातून सख्या भावासह त्याची पत्नी आणि मुलावर खूनी हल्ला करणाऱ्याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. त्याशिवाय त्याच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जयराम गोविंद बन्सल (वय ५५) असे अटक केलेल्याचे नाव आहे. संजय बन्सल, रेखा बन्सल आणि प्रियांश बन्सल अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. रेखा बन्सल (वय ३०, रा. आदर्शनगर झोपडपट्टी, बोपोडी )यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बोपोडीत घडली.
संजय आणि जयराम एकमेकांच्या सख्खे भाउ असून बोपोडीतील झोपडपट्टीत शेजारी राहायला आहेत. त्यांच्यात काल दुपारी घरगुती वादातून भांडण झाले. त्याचा राग आल्यामुळे जयराम आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांनी रेखा यांचा पाठलाग करून पाईपने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर संजय यांना लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले.
त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी प्रियांश मधे आला असता, तिन्हीही आरोपींनी त्याला पाईपने मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी आरोपी जयरामला अटक करण्यात आली आहे. त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शैलेजा शिंदे यांनी दिली आहे.