Pune Crime: वाद मिटवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर हल्ला, खुनाचा प्रयत्न

पुणे: मित्राला मारहाण केली जात असताना भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर पालघनने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोपोडी येथे घडला.

या प्रकरणी तिलक किशोर घागट (वय २९, रा. बोपोडी) याने दिलेल्या तक्रारीवरून देवेंद्र बिडलान (वय २२, रा. कांबळे वस्ती, औंध रोड), बली सेल्वराज (वय २२, रा. दापोडी), वृषभ परदेशी (वय २५) आणि धीरज बिडलान (वय २६, दोघेरी रा. औंध रोड) यांच्यावर खडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ नोव्हेंबरला बोपोडी येथील केस स्वीट्स होमसमोर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी देवेंद्र बिडलान हे मित्र आहेत. त्यांच्यात एक वर्षापूर्वी पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन भांडणे झाली होती. त्यानंतर आरोपी येता-जाता तक्रारदाराकडे रागाने बघत असत. दरम्यान, २१ नोव्हेंबरला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास आरोपी तक्रारदाराचा मित्र रवी यादव याला मारहाण करत असताना, तक्रारदार त्यांच्यातील भांडणे सोडविण्यासाठी गेले होते.

आरोपी बिडलान याने तक्रारदाराला शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तक्रारदाराच्या डोक्यात पालघनने वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तक्रारदाराने हातमध्ये घातला असता, त्याच्या हाताच्या बोटांना जखम झाली. त्यानंतर पालघन उलट्या बाजुने डोक्यात मारून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणाचा तपास खडकी पोलिस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.