पुणे – जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या एका बॅंकेच्या एटीएम केंद्रातून पैसे काढण्यासाठी महिलेला मदत करण्याचा बहाणा करून चोरट्यांनी तिच्या खात्यातून 36 हजार 900 रुपये लांबविल्याची घटना घडली.
याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील स्टेट बॅंकेच्या कोषागार शाखेत आल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास त्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्या. त्या वेळी त्यांच्या पाठोपाठ चोरटा एटीएम केंद्रात शिरला. महिलेला पैसे काढण्यास जमले नाही. त्यानंतर चोरट्याने महिलेकडून सांकेतिक शब्द घेतला. महिलेला मदत करण्याचा बहाणा केला. तिच्याकडील डेबिट कार्ड घेतले. महिलेला चोरट्याने त्याच्याकडील डेबिट कार्ड दिले. पैसे काढता येत नसल्याचे महिलेला चोरट्याने सांगितले.
पैसे न मिळाल्याने महिला तेथून गेली. त्यानंतर चोरट्याने महिलेच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून खात्यातून 36 हजार 900 रुपये काढून घेतले. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत.