पुणे – समर्थ पोलिसांच्या तपास पथकाने एका दुचाकी चोरास गुन्हा दाखल झाल्यापासून 12 तासाच्या आत अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. त्याने शेजारी रहाणाऱ्या व्यक्तीची गाडी चोरली होती. या गाडीचा वापर करुन तो कामधंद्यावर जात होता. घरी आल्यावर गाडी राहत्या घरापासून लांब लावली जात होती.
निलेश बाळु नेटके (रा. एसआरओ बिल्डींग न्यु नाना पेठ पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 4 ऑगस्ट रोजी हिरो होंडा कंपनीची पॅशन प्लस मोटार सायकल चोरी झालेबाबत तक्रार दाखल केली होती. दरम्यान समर्थ पोलीस ठाण्याचे पथक प्रट्रोलींग करीत असतांना नेटके हा निशात टॉकिज समोरुन हिरो होंडा पॅशन प्लस गाडीवरून संशयीत रीत्या जाताना दिसला. सदरच्या गाडीचा संशय आल्याने त्यास थांबवुन त्याचेकडे गाडीचे कागदपत्राबाबत विचारणा केली असता, तो असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे देवु लागला.
त्यास अधिक चौकशी कामी समर्थ पोलीस स्टेशन येथे आणले व गाडीच्या चॅसीस व इंजिन नंबर वरुन खात्री केली असता सदर गाडीचा ओरीजनल आर.टी.ओ.नंबर समजला. ही गाडीबाबत अभिलेख पडताळुन खात्री केली असता गाडी चोरीचा गुन्हा दाखल असलेचे समजले. त्याबाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरची गाडी तो रहात असलेल्या बिल्डींगच्या पार्किंग मधुन चोरी केल्याची कबुली दिली. सदर आरोपीस दाखल गुन्हयात अटक केली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक सुभाष पिंगळे करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार संतोष काळे, सुशील लोणकर, हेमंत पेरणे, सुमित खुट्टे, सुनिल हसबे, सुभाष पिंगळे, विठ्ठल चोरमले, निलेश साबळे, सुभाष मोरे, श्याम सुर्यवंशी, यांनी केली आहे.