पुणे – कल्याणीनगर येथील एच.एस.बी.सी. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंडिया प्रा.लि.कंपनीत 70 लाख रुपयांच्या नेटवर्कींग साहित्याची चोरी करण्यात आली होती. चोरी करणाऱ्या आरोपील येरवडा पोलिसांनी 24 तासात अटक केली. त्यांनी चोरीचा माल मुंबई येथे विकल्याची कबुली दिली. त्यानंतर माल विकत घेणाऱ्यालाही अटक करण्यात आले आहे.
याप्रकरणी कंपनीच्यावतीने मकरंद बेलुलकर(रा.कात्रज) यांनी फिर्याद दिली होती. तर चोरी प्रकरणी गणेश धोंडीराम डोलरे(31,रा.नऱ्हे) आणि कुलदीप रामचरण चौहान (33,रा.खेरवडा, बांद्रा) यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयावरुन डोलारे यास ताब्यात घेतले होते. त्याने कंपनीतील ऍक्सेस पॉईंट व ऍक्सेस स्विच चोरल्याची कबुली दिली. त्याने हे साहित्य बांद्रयातील कुलदीप चौहानला विकल्याचे सांगितल्यावर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. चौहान याच्याकडून 52 लाख 50 हजाराचे नेटवर्कींगचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एच.एस.बी.सी. कंपनीने केबलींगचे काम एका दुसऱ्या कंपनीला दिले होते. त्या कंपनीसाठी आरोपी डोलारे हा केबल टाकायचे काम करत होते. तर चौहानने त्याच्याशी संपर्क साधून केबल विकायच्या असतील तर घेऊ असे सांगितले होते. त्यानूसार सप्टेंबर 2020 महिण्यापासून आरोपी संधी मिळेल तस तसे एक एक बॉक्स कंपनीबाहेर आणून चौहानच्या ताब्यात देत होता. हे बॉक्स घेण्यासाठी चौहान मुंबईवरुन येत होता.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, पोलीस हवालदार गणपत थिकोळे, पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, अमजद शेख, नवनाथ मोहिते, मनोज कुदळे, किरण खुटे, गणेश वाघ, अनिल शिंदे, सुनिल नागलोत, सुनिल सकट, राहुल परदेशी, अजय पंडोळे, समीर भोरडे व संजय भरगुडे यांच्या पथकाने केली.