पुणे – गुंतवणूक केल्यास 60 दिवसांत दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने अंध व मूकबधिर नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या टोळीने 557 मूकबधिर नागरिकांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे फसवणूक करणारेही मूकबधिर आहेत.
सुयोग मेहता (33), फउद्दीन घोडनदीवाला ( 32, रा. साळुंके विहार), प्रदीप कोलते (29, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि चंचला सुयोग मेहता (32, रा. रायकरमळा, धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या आरोपींना दि.14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “अंध व मूकबधिर व्यक्तींची गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी देहूरोड परिसरातील व्यक्तीने तक्रार दिली आहे. आरोपी गुंतवणुकीसंदर्भात केलेला व्हिडिओ व पोस्टर दाखवून मूकबधिर नागरिकांना जाळ्यात ओढत होते. त्यासाठी आरोपींनी सुयोग ऍन्ड अभि एंटरप्रायझेस नावाची कंपनी स्थापन केली होती.
या कंपनीत फॉरेक्स ट्रेडिंग मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास 60 दिवसांत दुप्पट, तर 90 दिवसांत तिप्पट परतावा मिळेल, असे आमिष आरोपी दाखवत होते. त्यानुसार तक्रारदार यांनी आठ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांना आरोपींनी कोणत्याही प्रकारचा परतावा आणि मूळ रक्कमदेखील दिली नाही. तक्रारदार यांच्या प्रमाणेच आरोपींनी इतरांचीही फसवणूक केली होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. यातील आरोपी मेहता राज्याबाहेर पळून गेला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काळे यांच्या पथकाने या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली.
हावभावाचे व्हिडिओ दाखवून मार्केटिंग
दोघे मूकबधिर आरोपी व्हिडिओ कॉल करुन हावभावाद्वारे इतर मूकबधिर नागरिकांना गुंतवणुकीस बद्दल माहिती देत होते. एखाद्या गुंतवणूकदाराचा अनुभव चित्रित करुन त्याचा व्हिडिओही जाहिरातीसाठी वापरत असत. त्यांनी गुंतवणुकीसंदर्भातील काही पत्रकेही छापली होती. त्यांनी विश्वास बसावा, म्हणून दहा हजार गुंतवलेल्या काही जणांना परतावा म्हणून 40 ते 50 हजार रुपये दिले होते. एमएलएम मार्केटिंद्वारे त्यांनी राज्यभरात अनेकांना गंडा घातला.