पुणे – चार वर्षांच्या चिमुकलीचा आईनेच चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात घडली. याप्रकरणी आईला हडपसर पोलिसांनी अटक केली. मुलीच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही.
वैष्णवी महेश वाडेर (4) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई कल्पना हिला पोलिसांनी अटक केली. कल्पना तिच्या मुलीसोबत एकटी राहत होती. पंधरा दिवसांपूर्वी कल्पना सिद्धीविनायक दुर्वांकूर सोसायटी परिसरात राहायला आली. तिने भाडेतत्वावर घर घेतले होते. सोमवारी घरमालकाने जागा सोडण्यास सांगितले होते. घरमालक घरी गेला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता.
घरमालकाने कल्पनाला दरवाजा उघडण्यास सांगितले. तेव्हा तिने दरवाजा उघडला नाही. नंतर शेजारी आणि घरमालकाने तिला दार उघडण्याची विनंती केल्यावर तिने दरवाजा उघडला. तेव्हा वैष्णवीवर चाकूने वार करुन तिचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
घरमालकाने पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कल्पनाला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले.