पुणे- शहरात भाईगिरी, किरकोळ वाद आणी पुर्ववैमनस्यातून हाणामारीचे गुन्हे घडत आहेत. गुरुवारी एकाच दिवसात घडलेल्या तीन विविध गुन्हयांत चौघांना जबर मारहाण करण्यात आली. यासाठी कोयता, दगड आणी लोखंडी हत्याराचा वापर करण्यात आला आहे. यातील आरोपींमध्ये दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सराईत गुन्हेगाराने जबडा फोडला .
लष्कर पोलीस ठाण्यात अंकुश राम मगर(30,रा.चुडामन तालीम जवळ, भवानी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार प्रदीप राम अडागळे(27,रा.सोलापुर बझार, लष्कर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप अडागळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच त्याला 2014 मध्ये लष्कर पोलीसांनी तडीपार केले होते. अंकुश मगर हे गुरुवारी सुजाता मस्तानी जवळ मित्र रोहित पालखे सोबत गप्पा मारत थांबले होते. यावेळी प्रदीपने तेथे येऊन मी येथील भाई आहे, तुम्ही माझ्या एरियात काय करता ? अशी विचारणा केली. यानंतर रोहितच्या डाव्या हातावर दगड जोरात मारुन त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
अंकुश ही भांडणे सोडविण्यासाठी मधी पडला असता, त्याच्या डाव्या जबड्यावर दगड मारुन त्याला गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राऊत करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत जयंत अंकुश वाडेकर(27,रा.शनिनगर, आंबेगाव) याने दिलेल्या फिर्यादीनूसार अजय भगवान घाडगे(रा.आंबेगाव), संदिप धुमाळ आणी त्याच्या दोन साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जयंत वाडेकर गुरुवारी रात्र रात्री दुचाकीवरुन जात असताना अजय घाडगेने त्याची दुचाकी अडवली, यानंतर तुला लय माज आलाय का? तु संदिप धुमाळकडे बघतोस काय?असे बोलून कोयत्याने त्याच्या डाव्या हातावर वार केले.
कोयत्याने त्याच्या डाव्या हातावर वार केले. यानंतर त्याला गाडीवरुन खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर संदिपने त्याच्या डोक्यावर कोयता मारुन जखमी केले. याप्रकरणाचा तपास पोलीस नाईक कोलते करत आहेत.
किरकोळ कारणावरुन एकास लोखंडी हत्याराने डोक्यात मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री धानोरी येथे घडली. प्रतिक दौलत मोहोड (20,रा.बोपखेल) याने दिलेल्या तक्रारीनूसार साजीश अशोक कुरावत(रा.तापकिरनगर) आणी पोपट्यावर नावाच्या व्यक्तीवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रतिक हा त्याच्या मित्राच्या टी स्टॉलच्या उदघाटनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरुन घरी परतत होता. यावेळी त्याच्या ओळखीच्या साजीशने त्याला थांबवले. यानंतर चंद्रकांत नवले सोबत का फिरतोस ? अशी विचारणा करत शिवीगाळ करुन लोखंडी हत्यार डोक्यात मारले.
चंद्रकांत नवलेने साजीशविरुध्द पोलिसांमध्ये एक तक्रार दाखल केली होती. त्याच्या न्यायालयात सुरु असलेल्या तारखांना प्रतिक हा चंद्रकांत बरोबर जात होता. याचा राग मनात धरुन ही मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निकम करत आहेत.