पुणे – सत्य परिस्थिती लपवून खोटी माहिती देत पोटगी मागणाऱ्या पत्नीला न्यायालयाने दणका दिला आहे. पोटगीसाठी केलेला कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एन.आर.नाईकवाडे यांनी फेटाळला. शारीरिक विकार असण्याबरोबरच नोकरी व स्वत:चे घर असतानाही सत्य परिस्थिती या प्रकरणात लपविण्यात आल्याचे पतीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
पत्नीच्या शरीराला दुर्गंध येतो आणि पत्नीला बरेच शारीरिक विकार असल्याची माहिती पत्नीने लग्नाआधी पतीपासून लपवून ठेवल्यामुळे पतीने लग्न रद्द करून द्यावे, यासाठी कौटुंबिक न्यायालयामध्ये धाव घेतली होती. दरम्यानच्या काळात पत्नीने अंतरिम पोटगीचा अर्ज न्यायालयात सादर केला. स्वत:ला कुठेही नोकरी नाही, राहायला घर नाही. घर खर्चासाठी पैसे नाहीत. कोणतेही उत्पन्न नसल्याचे दाखवित घरभाड्यासाठी दरमहा 15 हजार रूपये, 50 हजार रूपये अंतरिम पोटगी, तसेच औषधोपचारासाठी 50 हजार रूपये व प्रवासासाठी 50 हजार रूपये मिळण्याची मागणी पत्नीने केली.
पत्नीने स्वत:च तिला आजार असलेली कागदपत्रे न्यायालयात सादर केली. न्यायालयाने पती-पत्नींना स्वत:च्या मालमत्ता व दायित्वाचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. ते सादर केल्यानंतर पत्नी नोकरी करत असून, तिला 70 हजार रूपये पगार व तिने 48 लाख रूपयांचे घर स्वत:च्या नावावर कर्ज काढून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात पत्नीने न्यायालयाची दिशाभूल करून सत्य परिस्थिती लपवून कायद्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्याचे पतीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पतीच्या बाजूने ऍड. पुष्कर पाटील, ऍड. रेश्मा सोनार, ऍड.शुभांगी जेटीथोर यांनी काम पाहिले.