Pune : न्यायालय बंद आणि बहिष्काराची भाषा बेकायदेशीर

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी वकील व न्यायाधीशांनी तळमळीने काम करण्याची आवश्यकता आहे. नव्या आणि अत्याधुनिक इमारती बांधून न्याय मिळत नाही; तर नव्याने उभारलेल्या न्यायालयांचा फायदा पक्षकारांना आपण करून देत आहोत की नाही याचा विचार वकिलांनी करण्याची गरज आहे. न्यायालयाचे कामकाज घटनेनुसार चालते. त्यामुळे वकिलांकडून न्यायालय बंद ठेवण्यासह बहिष्कार घालण्याची भाषा होत असेल, तर ती बेकायदेशीर आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.
येरवडा येथे उभारण्यात येणाऱ्या फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभात ओक बोलत होते. त्यावेळी सर्वौच्च न्यायाल्याचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर, प्रमुख जिल्हा न्यायाधाश महेंद्र महाजन, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड याच्यासह बार कौन्सिलचे पदाधिकारी, बारचे पदाधिकारी उपस्थित होते.
न्यायमूर्ती ओक म्हणाले की, न्यायालये ही वकील आणि न्यायाधीशांसाठी नसून, ती पक्षकारांसाठी असतात. ज्या ठिकाणी प्रलंबित खटल्यांची संख्या जास्त असते. तिथे न्यायालयाचे विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्याचा स्विकार वकिलांसह न्यायाधीशांना करावा लागेल. न्यायालयाचे विकेंद्रिकरण न झाल्यास ते एकप्रकारे घटनेची पायमल्ली करणारे ठरेल.
न्यायमूर्ती मोहिते-डेरे म्हणाल्या, न्यायालय ही फक्त विटांची वास्तू नसून लोकांच्या हक्कांचा न्याय निवाडा करणारी वास्तू असते. ट्रायल कोर्ट ही न्यायव्यवस्थेची पहिली पायरी आहे. न्यायालयात न्याय मिळण्याच्या अपेक्षेने आलेल्याला न्याय मिळवून देणे ही प्रत्येक वकिलाची जबाबदारी आहे. शहराची लोकसंख्या वाढण्यासह फौजदारी खटल्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे शहराला नवीन फौजदारी न्यायालयाची आवश्यकता होती. ती आत्ता पूर्णत्वास येत असून, ही समाधानाची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले.





