Pune : कोर्टाने विवाहच केला रद्द; वैवाहिक संबंधच प्रस्थापित न केल्याने दिला निकाल

पुणे : मनाविरोधात लग्न झाले आहे. नवराच पसंत नसल्याचे सांगत विवाहानंतर वैवाहिक संबंध न प्रस्थापित करणाऱ्या, तसेच ८ महिन्यानंतर माहेरला जात परत न येणाऱ्या पत्नीला न्यायालयाने दणका दिला आहे. विवाह रद्द करण्याचा आदेश वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. फुलबांधे यांनी दिला आहे. नोटीस पाठवूनही पत्नी हजर न झाल्याने न्यायालयाने हा एकतर्फा आदेश दिला. या निर्णयामुळे पतीला दिलासा मिळाला आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. १७ डिसेंबर २०२२ रोजी पारंपारिक पद्धतीने पाहणी करून दोघांचे लग्न झाले. लग्नात माधवीचा चेहरा उतरला होता. याबाबत माधवने विचारल्यास आजारी असल्याचे तिने सांगितले. काही दिवसांत सर्व सुरळीत होईल, अशी माधवला अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. पूजा झाल्यानंतर घर आवडले का, असे त्याने विचारले.
त्यावेळी पतीच आवडला नाही, घरच्यांच्या सागण्यावरून जबरदस्तीने लग्न करावे लागल्याचे तिने सांगितले. तिने वैवाहिक संबंधास नकार दिला. ती सतत माहेरी जायची. २० ऑगस्ट २०२३ रोजी माहेरी गेली. मात्र, माधव व कुटुबियांनी प्रयत्न करूनही ती परत आलीच नाही. त्यामुळे माधवने ॲड. राहुल जाधव यांच्यामार्फत दाखल केलेला लग्न रद्दचा अर्ज न्यायालयाने तो मंजूर केला.
घटस्फोट घेतल्यानंतर “घटस्फोटीत’ असा शिक्का पडतो. मात्र, चूक नसतानाही जोडीदारांकडून फसवणूक झाली आहे. त्यामुळे लग्न रद्द करण्यासाठी अर्ज केला जातो. तो मंजूर झाला. या निर्णयामुळे दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे आहेत.
-ॲड. राहुल जाधव, कार्यकारिणी सदस्य, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणे
आई-वडिलांना आवडलेले स्थळ मुले-मुलींना आवडेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे लग्न जमविताना घरच्यांनी मुलगा अथवा मुलीस विश्वासात घेणे महत्त्वाचे असल्याचेही ॲड. राहुल जाधव यांनी सांगितले.
विवाह रद्दसाठी १ वर्षांच्या आत करावा लागतो अर्ज
विवाह झाल्यापासून १ वर्षाच्या आत विवाह रद्द करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. या प्रकरणात १७ डिसेंबर २०२२ रोजी लग्न झाले होते. वर्षाच्या आत १४ डिसेंबर २०२३ रोजी दावा दाखल केला होता.





