पुणे – 24 केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांचीच होणार मोजणी

केंद्राची निवड होणार चिठ्ठी टाकून : ईव्हीएम मशीनवरील मते धरणार गृहित

पुणे – लोकसभा निवडणुकीत यंदा ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) वापरले जाणार आहे. या सुविधेमुळे मतदाराला आपले मत कोणाला दिले हे प्रिंट स्वरुपात दिसणार आहे. मतमोजणी मात्र ईव्हीएममशीन वरील मतदानाची होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्यांचीच मतमोजणी करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात एकूण फक्त 24 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांवरील मते आणि ईव्हीएम मशीनवरील मते यांचा ताळमेळ घातला जाणार आहे.

निवडणूक प्रक्रिया अधिक पारर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत. निवडणूक पूर्णपणे पारदर्शी करण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरुवातीला ईव्हीएम्‌ वापरण्यास प्रारंभ केला होता. यानंतर, ईव्हीएमसोबत व्हीव्हीपीएटी जोडले जाणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांना नविन ईव्हीएम मशीन (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट) आणि व्हीव्हीपीएटी मशीन दिले आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी 16 हजार 927 बॅलेट युनिट, 9 हजार 870 कंट्रोल युनिट आणि 11 हजार 81 व्हीव्हीपॅट मशीन दिले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर आता ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीन असणार आहे.

व्हीव्हीपॅट ही यंत्रणा वापरण्यात येत असली तरी मतमोजणी मात्र ईव्हीएम मशीनची होणार आहे. निवडणूक आयोगाने फक्त प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्यांची मतमोजणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी करण्यासाठी मतदान केंद्राची निवडही चिठ्ठी टाकून होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी हे चिठ्ठी काढून मतदान केंद्र निवडणार आहे. ईव्हीएमवरील मते व चिठ्ठांमधील मते यांचा ताळमेळ जुळतो की नाही, हे तपासले जाणार आहे.

लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. राजकीय पक्षांकडून याविषयी विविध आरोप करण्यात आले होते. मशीनमध्ये सेंटींग केलेली आहे. त्यामुळे हा उमेदवार विजय झाला. कोणत्याही उमेदवारासमोरचे बटन दाबले तरी ठराविक पक्षाच्या उमेदवाराला मत मिळते, असे अनेक आरोप करण्यात आले होते. काही जणांनी याविषयीच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल केल्या होत्या. तसेच काही जणांनी याविषयी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. यासर्व पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदाराने कोणाला मतदान केले याची माहिती मतदाराला मिळण्यासाठी व्हीव्हीपॅट या मशीनवर दिलेले मत प्रिंट स्वरुपात दिसण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे मतदाराच्या आणि उमेदवारांच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही, असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे.

स्लीप घरी घेऊन जाण्यास मज्जाव
ज्या उमेदवाराच्या समोरचे चिन्ह दाबले असेल ते चिन्ह आणि उमेदवाराचा अनुक्रमांक हे प्रिंट स्वरुपात व्हीव्हीपॅट मशीनवर सात सेकंद दिसणार आहे. त्यानंतर ही स्लीप कट होऊन या मशीनच्या बॉक्‍समध्ये पडणार आहे. ही स्लीप मतदाराला घरी घेऊन जाता येणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here