मोदींनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यात पुण्यातील नगरसेवकांचंही मोलाचं योगदान राहणार – चंद्रकांत पाटील

विमाननगर येथे नगरसेवक राहुल (आप्पा) भंडारे यांच्या अथक प्रयत्नातून बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या दोन टाक्यांच्या कामांचे भूमीपूजन

विश्रांतवाडी – पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर मोदीजींनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक स्वप्नं पाहिली होती. ती एकेक करून पूर्ण करत चाललेत. देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे होत असतानाही अनेक घरांमध्ये स्वच्छतागृह, घरगुती गॅस व वीज कनेक्शन नव्हती. त्या सर्व सुविधा पोहोचविण्यासाठी तसेच सर्वांना हक्काचं घर मिळण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या आहेत. त्याचबरोबर ऑगस्ट २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक झोपडीपर्यंत, घरापर्यंत पाइपलाइनद्वारे पिण्याचं पाणी पोहोचले पाहिजे, हे मोदीजींच सर्वात मोठं स्वप्न आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालयही निर्माण केले आहे.

त्यादृष्टीने सबंध देशात विविध ठिकाणी पाण्याच्या लाइन टाकण्याची कामे सुरू आहेत. मोदींनी पाणीपुरवठ्याबाबत पाहिलेलं ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये पुण्यातील नगरसेवकांचंही मोलाचं योगदान राहणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील केले.

प्रभाग क्रमांक तीनचे(विमाननगर-सोमनाथनगर) नगरसेवक राहुल (आप्पा) भंडारे यांच्या अथक प्रयत्नातून २४ बाय ७ योजनेअंतर्गत विमाननगर येथे ४५ लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्याचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक राहुल(आप्पा) भंडारे, अनिल (बॉबी) टिंगरे, योगेश मुळीक, तुषार पाटील, नगरसेविका श्वेता खोसे-गलांडे, मुक्ता जगताप, मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष खांदवे-पाटील, मोहनराव शिंदे-सरकार, महेंद्र गलांडे, संतोष राजगुरू, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही.जी.कुलकर्णी यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, पुणे महापालिकेच्या वतीने समान पाणी पुरवठा योजना, मेट्रो, बससेवा, मेडिकल कॉलेज, नऊशे बेडसचे रुग्णालय या सारखे महत्वकांक्षी प्रकल्प शहरात सुरू आहेत. त्याचबरोबर नगरसेवकांची प्रभागात विकास कामे मोठ्या प्रमानात सुरू आहेत. याशिवाय नियोजन केलेली कामे नगरसेवकांनी व नागरिकांनी पाठपुरावा करून येत्या सहा महिन्यात पूर्ण करावीत अन्यथा निवडणुका लागल्यानंतर ही कामे कागदावरच राहतील अशा सुचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, गेल्या दीड-दोन वर्षांपासून भाजपच्या नगरसेवकांना निधी मिळू नये म्हणून राष्ट्रवादीचे नेते मंडळी प्रयत्न करत आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. मात्र कितीही अडचणी आल्या तरी भाजपचे नगरसेवकच काम करत आहेत. राष्ट्रवादीकडे काही मतदार संघात उमेदवार नाहीत, त्यामुळे ते आमच्याच नगरसेवकांना लालच दाखवत आहेत. मात्र काही केले तरी महापालिकेत पुन्हा सत्ता आमचीच येईल असा ठाम विश्वास शहराध्यक्ष मुळीक यांनी व्यक्त केला.

माजी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, समान पाणी पुरवठा योजनेचे काम जैन इरिगेशनला मिळाले आहे, मात्र त्यांनी अद्याप काम सुरू केले नाही. भामा आसखेडचे पाणी आमच्याच खराडी भागाला मिळाले नाही. यासाठी भाजप सत्तेत असून देखील आपल्याला पाण्यासाठी आंदोलन करावे लागेल असा इशारा पठारे यांनी दिला. याशिवाय विकास कामांसाठी नगरसेवकाना निधी मिळत नाही त्यामुळे कामे रखडली असल्याचेही पठारे म्हणाले.

टँकरमुक्त प्रभाग होणार – भंडारे
विमाननगरसह आजूबाजूच्या परिसरात अनेक बहुमजली गृहनिर्माण सोसायट्या आहेत. सध्या त्यांना पाणीपुरवठा कमी होत असल्याने खाजगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. त्यासाठी त्यांना लाखो रुपये मोजावे लागत आहेत. परंतु या दोन टाक्यांचे पूर्ण झाल्यानंतर विमाननगर, संजयपार्क, साकोरेनगर, पुरु सोसायटी, राजीवनगर, यमुनानगर, म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिकांना उच्च दाबाने व मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. टाक्यांचे काम पूर्ण होण्यास साधारण ८ महिने लागणार आहे. दररोज सुमारे २ लाख नागरिकांना पुरेेेल इतके पाणी मिळणार असून संपूर्ण प्रभाग टँकरमुक्त होणार असल्याचे नगरसेवक राहुल(आप्पा) भंडारे म्हणाले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय (नाना) गवळी, दीपक चव्हाण, संतोष म्हस्के,अनमोल सांव ,धनंजय भिंगारदीवे, अभिषेक गाडे,निलेश गरुड,निखिल भंडारे,अर्जुन कांबळे,योगेश म्हस्के,गौतम झेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष खांदवे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संजय (नाना) गवळी यांनी केले.

बापू तुम्ही आमच्याबरोबर आहात ना..?
विकास कामे पूर्ण करून घेण्यासाठी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आपल्याकडे आहेत. याशिवाय मार्गदर्शक म्हणून माजी आमदार बापूसाहेब पठारे हे देखील आपल्याकडे आहेत, असे म्हणत बापू तुम्ही आमच्याबरोबर आहात ना? असे विचारताच बापूंनी मान हलविली. पण मान जरा कमी हालताना दिसते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.