सामाजिक संस्थाकडून शहराभरातील पाहणीत बाब उघड: नावे काढण्याबाबत आयुक्तांना पत्र
– हर्षद कटारिया
बिबवेवाडी – महानगरपालिकेस विविध माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून शहरात करण्यात येत असलेल्या विकासकामांचे श्रेय “संकल्पने’च्या नावाखाली घेत नगरसेवकांकडून सदर कामांवर स्वत:ची नावे टाकून “चमकोगिरी’ करण्याचा प्रकार फोफावत आहे.
शहरभरात दोन लाख 57 हजार ठिकाणी, असा प्रकार झाला असल्याचे दलित सेनेने केलेल्या पाहणीतून उघडकीस आला आहे. महानगरपलिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा मुद्दा चव्हाट्यावर येत असून अशा प्रकारे नागरिकांच्या कररूपी पैशातून लोक्रतिनिधींनी स्वप्रसिद्ध बंद करण्याबाबत पालिका प्रशासन, निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आल्याचे तसेच याबाबत न्यायालयातही याचिका दाखल करणार असल्याचे दलित सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील यादव यांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक 28 मध्ये एलईडी विजेच्या माहिती फलकांना अनधिकृत विजजोडला नागरिकांनी विरोध केल्याची घटना ताजी असतानाच आता विकासकामांवर सौजन्य, संकल्पनेतून अशा आशयाने नावे लिहून नगरसेवक “पब्लीसिटी’ करत असल्याचे सामाजिक संस्थांनी एकत्रीतरित्या केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
प्रभाग क्रमांक 28 मध्ये लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या स्मार्ट बसथांब्यावर मोठ्या आकारात नगरसेवकाने स्वतःचे व माजी नगरसेविका यांची छायाचित्रं लावून केलेल्या कामाला जाहिरातीचेच स्वरूप आले आहे. यासह प्रभागात “माननीयांच्या कार्यालयाकडे’, “घराकडे’ अशा आशयाच्या “एलईडी फलकांना’ही ऊत आला आहे. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे ओळख निर्माण करण्यापेक्षा आपल्या कामातून ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
“अशी’ उधळपट्टी आयुक्त थांबविणार का?
महानगरपालिका निवडणूक अवघ्या वर्षभरावर आलेली असल्याने शहरातील प्रत्येक प्रभागात आजी-माजी लोकप्रतिनिधींसह इच्छुकांच्या प्रसिद्धी फलकांची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यातून उद्याने, सार्वजनिक शौचालयाच्या भिंती, महानगरपालिकाच्या शाळाही सुटलेल्या नाहीत. क्षेत्रीय कार्यालयाच्या फलकांवरही संकल्पना व सौजन्यांच्या पाट्या नव्याने झळकू लागल्या आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पराभूत उमेदवारांची नावे तशीच ठेवत नवीन नगरसेवक जोमाने स्वतःची नावे जास्तीत जास्त जागी लिहिण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेने केलेल्या कामावर फक्त बाहेर फलक लावून ते आपल्या संकल्पनेतून तयार झाल्याचे भासवणे, हे एक प्रकारचे चौर्यकर्म असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे, अशा पद्धतीने सुरू असलेली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी महानगरपालिका आयुक्त थांबविणार का, असा प्रश्न या निमित्त उपस्थित होऊ लागला आहे.
संकल्पना फलक लावण्याच्या प्रकाराविरोधात आम्ही नागरिकांच्या सह्यांची मोहिम सुरू केली आहे. शहरातील अशा बोर्डवर प्रसिद्धी करण्यात आलेला खर्च निवडणूक वेळी करण्यात येणाऱ्या खर्चामध्ये समाविष्ट करण्यात यावा, असा अर्ज निवडणूक आयोगाकडे करीत अशा पद्धतीने नावे झळकविण्याच्या प्रकाराविरोधात रिट दाखल करणार आहोत.
– विजय कुंभार, सुराज्य संघर्ष समिती
प्रभागातील स्मार्ट बसथांबे करण्यासाठी प्रत्येक बसथांब्याला अंदाजे दोन ते अडीच लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.
– अजय खामकर, कनिष्ठ अभियंता बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय
पाणी, रस्ते, रोजगार अशा अनेक मूलभूत समस्या असताना नागरिकांच्या कररूपी पैशांवर डिजिटल प्रसिद्धीचा हव्यास पूर्ण करणारी कामे बंद करावीत. प्रभाग क्रमांक 28 मधील आजवर एकूण असा खर्च पहिला तर येथील प्रत्येक कुटुंबाच्या कररूपी हिस्साच्या रक्कमेतून माननीय स्वप्रसिद्धी करत आहेत, असेच म्हणावे लागेल.
– ललित ओसवाल , सामाजिक कार्यकर्ता
आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी नगरसेवकांची नावे असलेली फलकांची माहिती गोळा केली असून त्याची संख्या पुणे शहरात दोन लाख 57 हजार आहे. नागरिकांच्या पैशावर नगरसेवकांनी संकल्पनेच्या नावावर स्वतःची प्रसिद्धी करणे बंद करणे व ही सर्व नावे काढण्याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल करणार आहोत.
– सुनील यादव, प्रदेशाध्यक्ष दलित सेना
शहराभरात केल्या जाणाऱ्या विकासकामांवर संकल्पनेतून नगरसेवकांची नावे लिहिण्या संबंधात महानगरपालिका प्रशासन व राजकीय पक्ष, पदाधिकारी एकत्रपणे जो निर्णय घेतील, तो भविष्यात सर्वांवर बंधनकारक राहील.
– श्रीनाथ भिमाले, नगरसेवक