पुणे – नगरसेवकांच्या माता-पित्यालाही आता “अंशदायी’चा लाभ

पुणे – आजी, माजी नगरसेवकांसाठी महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या अंशदायी वैद्यकीय योजनेचा लाभ आता माजी नगरसेवकांच्या मातापित्यांना आणि मुलांना मिळणार आहे. या संदर्भातील प्रस्तावास स्थायी समितीने सोमवारी मंजुरी दिली.

माजी सदस्य आणि त्यांच्या पत्नी अथवा पतीस, तर विद्यमान सदस्य असल्यास त्या सदस्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च महापालिकेकडून केला जातो. त्यासाठी मुख्यसभेने 2014-15 मध्ये ठराव करून नगरसेवकांसाठी अंशदायी वैद्यकीय योजनेस मान्यता दिली होती. यानुसार, नगरसेवकांनी एखाद्या रुग्णालयामध्ये दाखल होत असताना महापालिकेला अगोदर कळवणे आवश्‍यक असते. यानंतर महापालिका प्रशासन रुग्णालयाला पत्र देऊन बिलाची हमी घेते. काही वेळा उपचार पूर्ण झाल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून नगरसेवकांच्या नावे बिले अदा करण्यात येतात. या योजनेचा लाभ माजी नगरसेवकांच्या मातापित्यांना आणि मुलांना मिळावा असा प्रस्ताव शिवसेना नगरसेवक संजय भोसले आणि विशाल धनवडे यांनी दिला होता.

त्यानुसार महिला-बाल कल्याण समितीने ठराव केला होता. तो स्थायी समिती पुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता त्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.