काळ्या फिती बांधून नोंदवला निषेध
पुणे – मुख्यसभेने मान्यता दिल्यानंतरही सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येत नाही, असा आरोप करत महापालिकेतील कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काळ्या फिती बांधून काम केले.
पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त), पीएमसी एम्प्लॉइज युनियन, डॉक्टर असोसिएशन, अधिकारी संघ, अभियंता संघ, मनपाची पंधरा क्षेत्रीय कार्यालये, 145 आरोग्य कोठ्या तसेच शिक्षण विभाग, बालवाडी शिक्षिका व सेविका, सर्व अधिकारी व कर्मचारी यात सहभागी झाले होते.
मुख्यसभेने दोन महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. तो अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र, हा प्रस्ताव महापालिकेतच असून लेखापाल आणि सामान्य प्रशासन विभागांतील समन्वयाअभावी तो पाठवण्यात आला नाही. याबाबत कामगार संघटनांनी तक्रार केली आहे.
कंत्राटी कामगांराना किमान वेतनाची अंमलबजावणी, क्षेत्रीय कार्यालयांतील कंत्राटी कामगारांचे थकित वेतन त्वरित अदा करावे, या प्रमुख दोन मागण्यांसाठी काम बंद न करता सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावत प्रशासनाच्या धोरणाचा निषेध केला. तसेच वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम जमा करावी, उचल म्हणून 50 हजार रुपये त्वरित खात्यावर जमा करावेत, अशी मागणी सर्व संघटनांनी केली.
पालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू झाला पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. या संदर्भात दोन दिवसांपूर्वीच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. हा ठराव मान्यतेसाठी तातडीने राज्य सरकारकडे पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, मनपा