पुणे-शहरात गेल्या 24 तासांत 3 हजार 374 नवीन करोना रुग्ण आढळले असून, बरे झालेल्या तब्बल 8 हजार 200 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 9 मार्च 2020 मध्ये करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर एकाच दिवसांत रुग्णांना डिस्चार्ज देण्याचा आज उच्चांक झाला आहे. दरम्यान, मागील 24 तासांत पुण्यातील 7 रुग्णांसह 10 रुग्ण उपचारादरम्यान दगावलेही आहेत. त्यामुळे हलगर्जीपणा टाळावा, असे आवाहनही अरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
शहरात मागील 24 तासांत 10 हजार 980 संशयितांची टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये 3 हजार 374 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. शहरात 36 हजार 340 सक्रीय बाधित असून, त्यापैकी 54 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत तर 358 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. शहरातील आतापर्यंतची रुग्णसंख्या 6 लाख 28 हजार 58 झाली असून, 5 लाख 82 हजार 497 रुग्ण बरेही झाले आहेत. तर 9 हजार 221 जणांचा मृत्यू झाला आहे.