पुणे – गेल्या 24 तासांत शहर आणि हद्दीबाहेरील भागात एकही करोना बाधित मृताची नोंद झाली नाही, तर नवे बाधित मात्र 61 नोंदवले गेले आहेत. पुण्यातच नव्हे तर एकूण राज्यातच करोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे आनंददायी चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या आठवड्यात म्हणजे दि.20 आणि 21 ऑक्टोबर रोजीही मृतांची संख्या शून्य नोंदवली गेली. त्याआधी 19 एप्रिल 2020 आणि 6 फेब्रुवारी 2021 या दोन दिवशीही एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही, ही समाधानाची बाब आहे.
दिवसभरातील बाधितांची संख्या 61 झाली असून, 82 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच दिवसभरात तीन हजार 864 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. सक्रीय बाधितांची संख्या सध्या 840 आहे. यामध्ये 141 जणांची प्रकृती गंभीर असून, 121 जण ऑक्सिजनवर आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले.