पुणे – शहरात गेल्या 24 तासांत 112 करोना बाधितांची नोंद झाली. तर, सक्रीय बाधितांची संख्या 994 वर आली आहे. दरम्यान, 27 एप्रिल 2020 रोजी सक्रीय बाधित संख्या 966 होती. त्यानंतर ती पहिल्यांदाच हजाराखाली आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
मार्च-2020 मध्ये करोनाची लागण झालेला पहिला रुग्ण सापडल्यानंतर बाधितांची संख्या जसी वाढत गेली तशी सक्रीय बाधितांचीही वाढली. सन 2020 मध्ये सप्टेंबरनंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ही संख्या बाधितांबरोबरच वेगाने वाढली. मार्च 2021 मध्ये दुसऱ्या लाटेत सक्रीय बाधितांची संख्या 25 हजारांपर्यंत गेली.
सध्या 5 लाख 3 हजार 357 बाधितांमधील 4 लाख 93 हजार 296 बाधित बरे झाले आहेत. त्यात सक्रीय असलेल्या 994 बाधितांपैकी 158 बाधितांची प्रकृती गंभीर आहे आणि 195 जण ऑक्सिजनवर आहेत. या दोन्ही संख्याही कमी झालेल्या दिसून येत आहेत.
गेल्या 24 तासांत 6 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील दोन शहरातील तर चार हद्दीबाहेरील आहेत. यांचा समावेश करून शहरात आजपर्यंत 9 हजार 067 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 4 हजार 780 संशयितांची स्वॅबटेस्ट झाली आहे. तर 119 जणांना डिस्चार्ज मिळाला.