पुणे- करोना बाधितांची संख्या कमी झालेली असतानाही, स्वॅब टेस्ट करणाऱ्यांची संख्या मात्र सात हजारांच्या पुढे आहे. यामध्ये करोना बाधितांपेक्षा फ्लू आणि न्युमोनियाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
नव्या करोना बाधितांची संख्या दि. 11 सप्टेंबरपासून दि. 1 ऑक्टोबरपर्यंत 200च्या आतच नोंदवली गेली आहे. परंतु, संशयितांच्या स्वॅब टेस्ट मात्र बहुतांश दिवसांमध्ये वाढतच गेली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वॅब टेस्ट झालेल्या असताना करोना बाधित त्यातून कमी आढळत असल्याने ही समाधानाची बाब ठरत आहे. शहरातील बाधितांचा दर हा एक दीड टक्क्यांपासून ते चार टक्क्यांच्या आसपास आहे.
सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर प्राधान्याने करोनाची टेस्ट नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे संशयितांची संख्या जास्त दिसत आहे. त्यामध्ये करोना बाधितांची संख्या कमी असली तरी “सिझनल फ्लू’ असलेल्यांची संख्या वेगाने वाढली आहे.
गेल्या काही दिवसांतील बदलत्या वातावरणामुळे सिझनल फ्लूचे प्रमाण जास्त दिसत आहे. यामध्ये काही प्रमाणात स्वाइन फ्लूचीही लागण झाल्याचे दिसून येत आहे. सिझनल फ्लू शिवाय 236 जणांना स्वाइन फ्लू झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये सुदैवाने कोणाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.