पुणे – करोना बाधितांची संख्या वाढली असून, गेल्या 24 तासांत 292 नव्या बाधितांची नोंद झाली आहे.
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बाधितांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेचे नियम पाळणे, गर्दी न करणे आणि मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. बाधितांची संख्या वाढली, तरी दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 189 च आहे. नऊ बाधितांचा मृत्यू गेल्या 24 तासांत झाला असून, त्यातील 4 मृत पुण्याबाहेरील आहेत.
शहरातील सक्रीय रुग्णसंख्येत गेल्या 24 तासांत 100 ने वाढ झाली असून, ती मंगळवारी 2 हजार 265 होती, तर बुधवारी 2 हजार 363 झाली आहे.सक्रीय बाधितांमधील 205 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 284 जणांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे.
ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्यांची संख्याही वाढत चालली आहे. आतापर्यंत शहरात 4 लाख 95 हजार 878 जण बाधित झाले असून, त्यापैकी 4 लाख 84 हजार 584 जण बरे झाले आहेत. तर 8 हजार 931 जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.
स्वॅब टेस्ट वाढल्या
गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या स्थिर होती. परंतु गेल्या आठवड्यापासून ती वाढत चालली आहे. त्यामुळे संशयितांच्या स्वॅब टेस्टही वाढल्या आहेत. पाच ते सात हजारांच्या घरातच स्वॅब टेस्ट होत होत्या. मात्र बुधवारी त्यांची संख्या 10 हजारांपार गेली. बुधवारी दिवसभरात 10 हजार 156 स्वॅब टेस्ट झाल्या.