पुणे- आजपर्यंत करोना बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यातील 90 टक्के रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक, रक्तदाब, मधुमेह, किडनी आदी आजारांनी ग्रस्त होते. घरातील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले आदींची विशेष काळजी घ्यावी. बाहेरुन घरी आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक ती काळजी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले आहे.
शहर आणि ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनमधील ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहे. त्यांची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी, वेळेवर औषध देण्यात यावी, त्यामध्ये खंड पडू देऊ नका, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.
लॉकडाऊन अंशत: शिथील झाल्याने नागरिक घराबाहेर पडत आहे. त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. करोना त्यांच्यासाठी प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात येऊ नका, असे आयुक्तांनी सांगितले आहे.