पुणे – शहरात नव्या करोना बाधितांची संख्या जशी वेगाने कमी होत आहे; त्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे. सुमारे 25 हजारांपुढे गेलेल्या चाचण्या आता 10 हजारांपर्यंत आल्या आहेत. त्या तुलनेत बाधितांची संख्याही कमी होत असून, पॉझिटिव्हिटी रेट 10.77 टक्क्यांवर आला आहे.
मार्च-एप्रिलमध्ये पॉझिटिव्हिटी रेट सुमारे 30 टक्क्यांपर्यंत गेला होता. त्यानंतरही तो अनेक दिवस 30 टक्क्यांच्याच दरम्यान राहिला. त्यानंतर तो 25 टक्क्यांवरही बरेच दिवस स्थिरावला होता. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून हा रेट कमी होत असून, तो आता 10 ते 11 टक्क्यांच्या दरम्यान झाला आहे.
शहरात गेल्या चोवीस तासांत नवीन 1 हजार 164 करोना बाधितांची भर पडली असून, बरे झालेल्या 2 हजार 407 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील 48 रुग्णांसह 72 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला आहे.
शहरातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 15 हजार 232 पर्यंत कमी झाली आहे. यापैकी 1 हजार 348 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. आतापर्यंत 4 लाख 62 हजार 172 पुणेकरांना करोनाची बाधा झाली असून, यापैकी 4 लाख 39 हजार 97 रुग्ण बरे झाले आहेत. तर 7 हजार 843 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत 10 हजार 806 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली.