पुणे – 30 ते 60 वयोगटासाठी करोना ठरला जीवघेणा

पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेत पिंपरी-चिंचवड शहरात 30 ते 60 वयोगटातील काही रुग्णालयांत दाखल झालेल्यांपैकी सुमारे 53 टक्के बाधितांचा मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले. त्यानुसार पुण्यातही महत्त्वाच्या रुग्णालयांत अशाप्रकारे

सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, असा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.पिंपरी-चिंचवड महापालिकेने अण्णासाहेब मगर रुग्णालय (जम्बो कोविड), वायसीएम, आदित्य बिर्ला आणि डी.वाय.पाटील रुग्णालय या प्रमुख चार रुग्णालयात करोनामुळे मृत्यू झालेल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 30 ते 60 वयोगटातील बाधितांचे मृत्यू प्रमाण 53 टक्के इतके आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत 60 वर्षांपुढील बाधितांचे अधिक मृत्यु झाला. दुसऱ्या लाटेत 30 वर्षांपुढील बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यावरून तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक आहे, असे तज्ज्ञांकडून वर्तविले जात असेल. पण, पालकांना घाबरवयाचे नाही, परंतू आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी, असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला.

“मधुमेह, रक्तदाब यासह अन्य आजार असलेल्या व्यक्तींना करोना संसर्ग होण्याची भीती अधिक असून, त्यामुळे मृत्यु ओढावू शकतो. मात्र, दुसऱ्या लाटेत पिंपरी-चिंचवडमध्ये 53 टक्के मृत्यूंपैकी 43 टक्के बाधितांना कोणताही आजार नसल्याचे दिसून आले.

 

त्यामध्ये 31 ते 44 वयोगाटातील संख्या अधिक आहे. त्यामुळे “मला काही होत नाही,’ असा भ्रमात न राहता काळजी घ्यावी. दोन्ही लाटांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांच्या मृत्युचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तींनी ऑक्‍सिजन पातळी खाली येताच डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा,’ असेही पवार म्हणाले.

लस घेतली, तरीही निष्काळजीपणा नकोच
“अमेरिका, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका याठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले, असले तरी करोनाची तिसरी लाट येऊ पाहत आहे. त्या तुलनेत भारतात लसीकरण अत्यल्प आहे. त्यामुळे गाफील न राहता काळजी घ्यावी. आपला निष्काळजीपणा मृत्यू ओढावू शकतो. एखाद्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती मरण पावल्यावर त्या कुटुंबाची काय अवस्था होते, हे आपण दुसऱ्या लाटेत पाहिले आहे. त्यामुळे काळजी घ्या,’ असे आवाहन अजित पवार यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.