पुणे – हवाई दलाच्या मालवाहतूक विमानांनी ऑक्सिजन टॅंक आणि औषधांच्या वाहतुकीसाठी आतापर्यंत तब्बल 1,419 तास उड्डाण केले आहे. यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या उड्डाणांचा समावेश आहे.
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन आणि अनेक औषधांची गरज भासत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशात कमी वेळात जलद गतीने औषधे आणि ऑक्सिजन यांची वाहतूक करता यावी, यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात आली. त्यानुसार हवाई दलाच्या आयएल-76, सी-17, एन-32, सी-130 या मालवाहू विमानांच्या सहाय्याने ऑक्सिजन टॅंकर, टॅंक आणि औषधांची वाहतूक केली जात आहे.
याबाबत हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, 12 मेपर्यंत भारतीय हवाई दलाच्या मालवाहू विमानांनी एकूण 1,419 तास प्रवास केला. यामध्ये 731 वेळा विमानांनी उड्डाण केले. यादरम्यान विमानाद्वारे 498 ऑक्सिजन टॅंक आणि 367.8 कंटेनरद्वारे इतर वैद्यकीय साधनांची वाहतूक करण्यात आली. भारतातही विविध प्रदेशांसोबतच ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलॅंड, यूएई, इस्रायल, फ्रान्स, जर्मनी, यूके या राष्ट्रांचा यामध्ये समावेश आहे.
यापूर्वीदेखील दिला आहे मदतीचा हात
गेल्या वर्षी करोना काळात जेव्हा काही भागात आरोग्य सुविधांची गरज होती, तेव्हाही हवाईदल मदतीला धावून आले होते. यापूर्वीदेखील हवाई दलाच्या विमानांद्वारे वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये करोना चाचणीचे नमुने प्रयोगशाळांमध्ये पोहचवणे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वाहतूक अशा प्रकारच्या मदतीचा समावेश होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर नियोजन तातडीने करण्यात आले होते.