पुणे -जिल्ह्यात ज्या वेगाने करोना बाधितांची संख्या वाढते, त्यानुसार 31 मार्च अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या तब्बल 8 लाख 71 हजारापर्यंत पोहचेल. तर सक्रीय बाधित संख्या 42 हजार असेल, अशी शक्यता राज्य शासनाकडून वर्तविण्यात आली आहे. मात्र, सद्यस्थितीतील बाधित संख्या आणि दिवसेंदिवस वाढविण्यात येणारे निर्बंध पाहता, बाधित संख्या कमी राहील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे जिल्ह्यामध्ये शुक्रवारी एकूण बाधित संख्या 4 लाख 53 हजार 532 इतकी आहे. मागील पंधरा दिवसांत जिल्ह्यातील बाधित संख्या 44 हजार 614 तर 1 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान एकूण 73 हजार 922 बाधित सापडले आहेत. त्यामुळे पुढील बारा दिवसांत जास्तीत 50 हजाराने वाढली, तरी पाच ते सव्वा पाच लाखांपर्यंत पोहचेल.
दरम्यान, जिल्ह्यात बाधित सापडण्याचे प्रमाण 20.5 टक्के इतके आहे. जिल्ह्यात सध्या 26 हजार 792 बाधित सक्रीय असून, त्यातील 2 हजार 19 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील बाधित संख्या कमी व्हावी, संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे, प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. अशी महिती प्रशासनाकडून देण्यात आली.
गरज
साधे बेड्स37 हजार ऑक्सिजन बेड्स5,764 व्हेन्टिलेटर बेड्स1,093
उपलब्धता
साधे बेड्स40 हजार 400
ऑक्सिजन बेड्स7,015
व्हेन्टिलेटर बेड्स1,211